Sunday, December 19, 2010

कळतंय पण वळत नाही

नमस्कार सर,
हे मी करमत नाही म्हणून लिहित नाही, तर खरोखर काही मार्गदर्शन आपण करावे म्हणून लिहित आहे कारण online कौन्सिलिंग ची फी तर आपणास माहीतच आहे! तुम्हाला ती द्यावी लागणार आणि तुम्ही मागितली तरी द्यायला (अगदी सेकंदाच्या हिशेबाने) आपण तयार आहोत! कारण हल्ली मी रुना बर्न बाईंचे 'द सिक्रेट' वाचले आणि त्याबरहुकुम वागण्याचा प्रयत्न केला, म्हणजे मी स्वतःला अब्जोपती आहे असे समजू लागलो आणि शब्दश: तसा वागू लागलो, पण आय किंवा उत्पन्न मात्र काही नाही मात्र तसा खर्च मात्र लोक सांगू लागले आहेत, त्याविषयी काय करावे? म्हणजे सविस्तर सांगायचे तर आता सोबर असताना नको ते लोक आपल्या जवळ येतात किंवा जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात, आपल्या भिडस्त स्वभावामुळे आपण त्यांना कांही बोलत नाही हि बाब अलहिदा. मात्र अशा लोकांच्यात राहिल्याने त्यांचे ऐकून घ्यावे लागते आणि कधी 'तसे' म्हणजे त्यांनी सुचवलेले करून पाहावे लागते आहे. त्यानुसार अशा लोकांना माझे दात (नसलेले) खटकतात! जे मला आजतागायत दहा वर्ष खटकले नाहीत! त्यांच्या म्हणण्यानुसार मी मनावर घेऊन आणि सिक्रेट वाचून डॉ. नंदा यांच्या क्लिनिक मध्ये गेलो...तर त्यांनी खर्च फक्त सत्याऐंशी हजार इतका क्षुल्लक सांगितला.आता सिक्रेट च्या हिशेबाने हा चील्लरच खर्च नाही का? असो.
आणि आता थोडे नाटक सिनेमा यात रमत असल्याने सद्यस्थितीत जर मला कोणी विचारले की, सुखी माणसाचा सदरा कोठे आहे? तर मी माझा सदरा देण्यास तयार असतो...इतकी बेफिकिरी सध्या आहे...पण माझा प्रॉब्लेम काय आहे हे कदाचित अजून मला नीट कळत नसावे.
कारण जेंव्हा इथे येतो, तेंव्हा मिटिंग मधल्या विषयाशी आपण (मी ) स्वतःला ताडून बघतो तेंव्हा कळते (तेदेखील मिटिंग नंतर...) त्याचे असे झाले की, मी शनिवारी मिटिंग नंतर घरी आलो तेंव्हा आईने सांगितले, की 'बघ, आज जेवण तयार आहे.'
हे लिहिण्याचे कारण की, मागच्या महिन्यात शनिवारी मिटींगला येत असताना आईने विचारले होते की घरी किती वाजता येणार? मी काही सांगितले नाही कारण एखाद्या वेळी मी परस्पर सिनेमाला वगैरे जात असतो त्यामुळे.
त्यानंतर मी मिटिंग संपल्यावर लगेच घरी आलो, तर जेवण तयार नव्हते त्यावर मी भयंकर रागावलो आणि फाडकन आईला बोललो की आज जेवण करणा-या बाईला का जेवण न बनवता जाऊ दिले?
वास्तविक मी इतके चीडण्याचे कारण नव्हते. एखाद्या तासाने काही फरक पडणार नव्हता, मात्र मी जे काही थोडे वेडेवाकडे बोललो, ते बोलत असताना मला भलेही नंतर असे बोललो त्याचा पश्चाताप झाला, तरी त्यावेळी तरी बरेच वाटत होते. याचा अर्थ सारंग सरांनी सांगितले तसे मी अजून जुनी खुन्नस resentment काढली नसेल,किंवा मागचे कांही अजून तसेच असेल. मात्र मी त्याचा अर्थ असा काढला की राग मागचा अजून कदाचित आहे. 
थोडे विस्ताराने सांगायचे तर आईला आता काम होत नाही म्हणून घरी स्वयंपाकाला बाई आहे, कारण घरी बहिण व भाऊ दोघांनाही कामाला जायचे असल्याने त्यांना वेळेत डबा हवा.
आता मी मला काय समजते ते सांगतो...
मला कळते की, आठवडाभर बाईच्या हाताचे खायचा कंटाळा आला असेल म्हणून बाईला सुटी देऊन आई स्वतः काहीतरी नवीन पदार्थ करेल हे समजते, तसेच मी बाहेर कधी काही खाऊन येईन अथवा घरीदेखील कधी उशिरा जेवतो हे माहित असल्याने तिला मला काही सांगावेसे वाटत नसेल...पण कळत असून देखील कदाचित मला मागे मला हवे त्या वेळी पैसा, जमीन दिली नाही, आता कदाचित मी त्यावेळी काहीतरी केले असते याचे वाईट वाटते...असे कळते मात्र त्यानंतर मी क्षुल्लक  बाब म्हणून याकडे पहिले.
मात्र आज पुन्हा असेच काही झल्यावर प्रकर्षाने आठवण झाली. असो.
येत गेल्याने कमीत कमी अजून भरपूर सुधारणा बाकी आहेत हे लक्षात येते आणि आता थंडी मस्त पडल्याने तोंडावर पांघरून घेऊन उशिरापर्यंत झोपण्यात जी मजा आहे ती सकाळी इनपुटला येण्यापेक्षा जास्त वाटत आहे....! तरी येण्याचा प्रयत्न नक्की करीन.
सध्या तरी आपण सेकंदाला कौन्सिलिंगचे पैसे देण्यास तयार आहोत (सिक्रेट नुसार देऊ नका...तर दिल्यासारखे वागा!) असो.
कळावे

Saturday, December 11, 2010

तडजोड

ख-या अर्थाने 'कृपा' मधील सहजीवन किंवा तेथील विश्व हा अत्यंत मर्यादित असा भाग आहे. इथे मी माझ्या मर्जीने राहत असो अथवा नाईलाजाने राहत असो, मला येथील दिनक्रमापासून ते जेवण इत्यादिपर्यंत सर्व बाबतीत तडजोड स्वीकारावी लागते. हा दिनक्रम मला कांही दिवसात अंगवळणी देखील पडतो. याचा अर्थ तो मी स्वेच्छेने स्वीकारला आहे असा अजिबात नाही. कारण जर तसे असते तर डिस्चार्ज झाल्यानंतर घरीदेखील मी तो आचरणात आणायला हवा. पण तसे होत नाही. याचाच अर्थ मी एका मर्यादित काळापर्यंत येथे राहणार असून तो दिनक्रम मी त्या कालावधीत पाळेन, हे स्वतःला घातलेले एक बंधन आहे का? तर नाही, तो स्वतःशी केलेला एक समझोता आहे असे मी म्हणेन.
आता त्याचे विश्लेषण आणि निगोसिएशन या सर्व बाबी आणि सेल्फ एस्टीम या शब्दांच्या जंजाळात मी स्वतःला बसवून विश्लेषण करू इच्छित नाही आणि माझे ते काम देखील नाही! मात्र स्वानुभव आणि एखाद्या प्रसंगावरून माझे तेथे वर्तन कसे होते आणि घरी त्याच प्रकारचे एखाद्या समस्येत मी कसे वर्तन करतो याविषयी आपण मला मार्गदर्शन करा. कारण मी 'कृपा' मध्ये कोणत्याही प्रसंगात असे म्हणू शकतो की, मला कांही इथे संपूर्ण आयुष्य काढायचे नाही....तसे घरी देखील म्हणू शकेन मात्र इथे तसे का होत नाही? 
प्रथम मी 'कृपा' मधील एक प्रसंग सांगतो.....
मी येथे येवून साधारण तीन महिने लोटले होते. येथे मी ब-यापैकी रुळलो होतो. त्यावेळी आता आज येथे एक आफ्टर केअर पेशंट आहेत ते पेशंट म्हणून आले होते. त्यांच्याविषयी मला बरेच कांही सांगण्यात आले होते. ( जसे
की ते फार घमेंडी आहेत..अतिशहाणे आहेत इत्यादी इत्यादी) पण मी तसा ऐकून कोणाविषयी पूर्वग्रहदुषित करून घेत नाही हि एक माझी  बाजू आहे. असो. तर त्यांचा आणि माझा कांही असा फारसा कधी संबंध आला नाही.जुजबी बोलण्याव्यतिरिक्त मी त्या गृहस्थांशी कधी जास्त बोललो नाही किंवा तेदेखील. मात्र पंधरा एक दिवसांनंतर ते अंघोळीला आले. माझ्या आधी त्यांचा नंबर होता. त्यांनी गरम पाण्याच्या रांगेत दोन बादल्या लावल्या होत्या. मी त्यांना एक बादली काढून घेण्याविषयी अत्यंत सौम्य, मृदू भाषेत विनंती केली. त्यावर ते गृहस्थ मला म्हणाले, की ते रोज दोन बादल्याच पाणी घेतात. मी त्यांना अजून नम्रपणे सांगितले की, मी देखील इतरांसारखा थंड पाण्याने नाही अंघोळ करु शकत. मला देखील सर्दी होते. त्यावर ते हट्टाला पेटले व मला कोपिंग स्कील आणि आपण येथे काय शिकतो हे सांगू लागले आणि त्याचबरोबर त्यांना दम्याचा त्रास कसा आहे हे मला पटवून देवू लागले. वास्तविक मी त्यांना सांगितले की, तसा त्रास आपणास आहे तर आपण चार वाजता आंघोळ करत जा. इथे एक बादली भरण्यास किमान पाच मिनिटे लागतात. इतर वेळी ठीक आहे मात्र आता इनपूटची वेळ होते. त्यावर ते मला अरेरावीची भाषा करू लागले आणि मी दोनच बादल्या घेणार कारण मी रोज घेतो असे म्हणू लागले. त्यावर मी त्यांना नम्रता वगैरे सोडून माझ्या भाषेत (जी इथे लिहिता येत  नाही!) समजावले. त्यावर त्यांनी एक समझोता केला की यापुढे मी (म्हणजे ते) माझी बादली मागे असेल तर मला प्रथम भरून घेऊ देतील आणि त्यानंतर ते घेतील. मला हेच हवे होते!
आता हा वरवर क्षुल्लक वाटणारा मुद्दा असू शकतो मात्र यामागे माझ्यावर अन्याय होतो आहे, सर्व आणि विशेषत: मी एक एक बादली घेत असताना हे गृहस्थ दोन-दोन बादल्या कशा काय घेऊ शकतात?आणि इतर  भरपूर अविवेकी तर्क असण्याची शक्यता आहे. तो माझा विषय नाही. तर इथे त्यांनी दोन काय चार बादल्या घ्याव्यात मात्र माझ्यानंतर घ्याव्यात हा समझोता मला माझा अहंकार सुखावणारा वाटत होता.  वास्तविक एखाद्या दिवशी दोन मिनिटे उशीर म्हणजे काही आकाश कोसळत नाही हे मला देखील ठावूक होते मात्र त्यांची सरशी होऊ द्यायची नाही हे काहीतरी ठरवलेले असावे!असो.
हेच घरी दोन तीन माणसांत देखील मी पूर्वी मी करू शकत नसे! जसे टीव्ही...कोणी सहज चनल बदलले तरी मी रागाने उठून दारू पिण्यास जात असे. आता किमान तसे होत नाही...धन्यवाद कृपा!!!